पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
आता प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 23 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
या प्रवेश प्रक्रियेत शाळांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाणार आहे. परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहु नये. तर आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिवस पहावा.
तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये, अशा सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या राज्यातील 3 हजार 223 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1 हजार 892 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.