मुंबई – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक, त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना लॉकडाऊनमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड.अनिल परब यांनी दिली.
दिनांक 22 मार्च पासून करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यावर 22 मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही. अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना मुदतवाढ अथवा परतावा रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री परब यांनी संगितले.