अडीचशेपेक्षा कमी सदस्यांच्या सोसायटी निवडणुकांना मुदतवाढ

निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्‍यता

पुणे – अडीचशे अथवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार विभागाने नव्या आदेशान्वये सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी तीन महिने पुढे ढकलल्या आहेत. ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका आता मे महिन्यात होण्याची शक्‍यता आहे.

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी अडीचशेपेक्षा कमी सदस्यांच्या गृहनिर्माण संस्थांना निवडणुकीतून दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शहरातील सुमारे 90 टक्‍के सोसायट्यांना सर्वसाधारण सभेतच नव्या व्यवस्थापन समितीची निवड करता येणार आहे; परंतु सहकार विभागाने त्यासाठी नियमावली तयार करणे गरजेचे होते. या संदर्भात सरकारने निवडणूक नियमावलीचा आराखडा हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध केला होता.

त्यावर अनेक गृहनिर्माण संस्थांनी आक्षेप नोंदविले होते. त्यावर सुनावणी घेऊन नियमावलीला अंतिम रूप देण्यापूर्वीच सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमुक्‍ती योजना जाहीर केली आहे. या संपूर्ण योजनेचे कामही सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनाच करावे लागणार असल्याने गेल्या महिन्यातच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी पहिल्यांदा 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर दुसरी मुदतवाढ 29 फेब्रुवारीपर्यंत दिली होती. आता 30 एप्रिलपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्याचा अध्यादेश काढला आहे.

सहकार खात्याकडील कामाचा आवाका पाहता दिलेल्या मुदतीमध्येही हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता नसल्याने सहकार विभागाने नुकतीच सर्व संस्थांच्या निवडणुकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे अडीचशेपेक्षा कमी सदस्यसंख्येच्या संस्थांमधील निवडणुका एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्‍यता असतानाच, नव्या अध्यादेशानुसार ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.