आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

4 मे अंतिम तारीख : औंधला तक्रारी सर्वाधिक

पुणे – बालकांच्या मोफत आणि सक्‍तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेस दि. 4 मे 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी दि. 26 एप्रिलची मुदत देण्यात आली होती, मात्र, अद्याप निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसल्याने अखेर यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येणे शक्‍य होणार आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यात अडचणी येत असल्याने प्रवेशास मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. राज्यभरातून आरटीईअंतर्गत 67 हजार 706 जणांचे प्रवेश निश्‍चित करण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यातून केवळ 34 हजार 494 तर पुणे जिल्हयातून 7 हजार 256 पालकांनी प्रवेश घेतले आहेत. कागदपत्रांची पडताळणी करून मिळण्यास विलंब लागत असल्याने प्रवेश घेण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

दरम्यान, बऱ्याच पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असून घर ते शाळा अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तसेच काही पालकाना पॅन कार्ड मागून तुमचे उत्पन्न जास्त असल्याने प्रवेश नाकारत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्हीबाबत सर्वात जास्त तक्रारी औंध भागात आहेत. पडताळणी समितीपैकी एखादाच अधिकारी उपस्थित रहात असून, पालकांना विश्‍वासात घेऊन चुकाची माहिती न देता ,पोलीसी पद्धतीने शंका घेऊन पालकाना नाउमेद केले जात आहे. त्यामुळे अनेक मुले या शैक्षणिक संधीपासून वंचित राहत असल्याचा आरोप आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.