पुणे (प्रतिनिधी)- रुपी बॅंकेवरील रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांची मुदत आणखी तीन महिन्यानी वाढविण्यात आली आहे. आत्तापर्यत ही 21 वी मुदत वाढ मिळाली आहे. रूपीवरील निर्बंधांची मुदत येत्या 31 मे 2020 रोजी संपणार होती. त्याप्रमाणे आज रिझर्व्ह बॅंकेने 31 ऑगस्ट 2020 पर्यत ही मुदत वाढवली आहे.
दरम्यान रिझर्व्ह बॅंकेच्या सुचनेनूसार रूपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने रूपीच्या विलीनीकरणाला तयारी दर्शविली आहे. हे विलीनीकरण होताना ठेवीदारांचे कुठलेही नुकसान होणार नाही व त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक स्थितीवरही अनाठायी बोजा पडणार नाही असा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची छाननी सुरू आहे. दोन्ही बॅंकेच्यावतीने पाठपुरावा सुद्धा करण्यात येत आहे. रूपी बॅंकेचे लेखापरिक्षण लवकरात लवकर पुर्ण करून घेण्यासाठी बॅंक प्रयत्नशील आहे.
रूपी बॅंकेवर फेब्रुवारी 2013 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले आहेत, त्यानंतर आत्तापर्यत 21 वेळा मुदतवाढ मिळाली आहे. सातत्याने मुदतवाढ मिळणे म्हणजे प्रशासक मंडळाने केलेल्या कामाची पावती आहे.बॅंकेने गेली चार वर्षे सर्व प्रकारचे व्यावसायिक निर्बंध असतानाही कर्जवसूली व गुंतवणूकीद्वारे परिचालनात्मक नफा मिळविला आहे यामधून बॅंकेची व्यवसायक्षमता दिसून येते असे प्रशासक सुधीर पंडीत यांनी सांगितले.