उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या डॉक्टर, वकिलांचाही समावेश
नवी दिल्ली -केंद्र सरकारने लघुउद्योगासाठी तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याची योजना जाहीर केली होती. आता ही योजना विस्तारित करण्यात आली असून उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांचाही नव्या लघुउद्योगांच्या व्याख्येनुसार या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
अगोदर जाहीर केलेल्या योजनेनुसार 29 फेब्रुवारी रोजी ज्या लघुउद्योगाकडे 25 कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशांना पुढील कर्जाची हमी देण्यात आली होती. आता 50 कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या लघुउद्योगांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. अगोदर पाच कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी देण्यात आली होती. आता त्यात वाढ करून दहा कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी देण्यात आली आहे.
अगोदर 100 कोटी रुपये उलाढालीचा लघुउद्योगांना या योजनेसाठी पात्र समजण्यात येत होते. आता ही मर्यादा अडीचशे कोटी रुपये करण्यात आली आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.