पुणे – करोना पार्श्वभूमीवर राज्यातील 108 मद्यार्क निर्मिती उद्योगांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी दिली होती. मात्र, संसर्ग अद्यापही कमी न झाल्याने अन्न व औषध विभागाच्या वतीने त्यांस 31 डिसेंबरपर्यंत मुतदवाढ दिली आहे.
करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी नागरिक, आरोग्यसेवक, रुग्णालय इत्यादींमध्ये हॅन्ड सॅनिटायझर वापरले जाते. त्यामुळे त्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मागणीनुसार पुरवठा व्हावा म्हणून विविध शासकीय यंत्रणांना हॅन्ड सॅनिटायझर उत्पादकांना इथेनॉलचा पुरवठा होण्याबाबतच्या अडचणी दूर करण्यास सांगितले आहे. याशिवाय, सॅनिटायझरचे उत्पादन करू शकणाऱ्या साखर कारखान्यांना परवानग्या देण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. राज्यात जवळपास 108 डिस्टलरीजला हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी खास परवानगी मिळाली होती.
दरम्यान, देशभरातील 45 गाळप कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हॅंड सॅनिटायझरच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. तर, 55 पेक्षाअधिक गाळप यंत्रणांनादेखील ही परवानगी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आणखी जास्त कारखान्यांना हॅंड सॅनिटायझर्सच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातील उत्पादकांनी उत्पादन सुरू केल्याने राज्यात सॅनिटायझरचा तुटवडा भासला नाही. त्यामुळे ग्राहक तसेच रुग्णालयांना हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहणार आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या बैठकीत हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा कायम ठेवण्याकरिता राज्यातील डिस्टलरींकडून होणारे सॅनिटायझरचे उत्पादन सुरू ठेवण्यावर एकमत झाले. त्यानुसार डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरू ठेवण्यास मुतदवाढ दिली आहे.
एप्रिल महिन्यात 80 लाख लिटर्स सॅनिटायझरची विक्री
252 प्लांटस् सॅनिटायझर बनवतात, ज्यामध्ये 108 डिस्टलरी आहेत. एप्रिलमध्ये राज्यामध्ये जवळपास 80 लाख लीटर सॅनिटायझरचा वापर झाला होता. मे महिन्याचा विक्री डेटा एफडीएकडून संकलित केला जात आहे. याशिवाय, सॅनिटायझरच्या दर्जा नियंत्रणासाठी आता कडक देखरेख केली जाणार आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली होईल आणि मोठ्या संख्येने नागरिक कामासाठी बाहेर पडतील, त्यावेळी सॅनिटायझरच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यावेळी सॅनिटायझरचा तुटवडा भासू नये, याकरिता या उपाययोजना केल्या जात आहेत.