नवी दिल्ली : देशातील इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली. कर भरणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर भरण्याची नवी तारीख आता ३१ जुलै २०२० असणार आहे.
दरम्यान, केंद्राकडून यापूर्वीच आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआर भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिसूचनेद्वारे विविध गुंतवणूकी आणि आय-टी कायद्यांतर्गत कपात करण्याचा दावा करण्याची मर्यादादेखील एक महिन्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविली आहे.
* नवीन अंतिम मुदतीच्या तारखा
१) आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) साठी मूळ तसेच सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
२) आर्थिक वर्ष २०१९-२०२० (मूल्यांकन वर्ष २०२०-२१) साठी प्राप्तिकर परताव्याची मुदत तारीख ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत भरलेल्या उत्पन्नाचा परतावा ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत भरता येईल. यामुळे टॅक्स ऑडिट अहवाल देण्याची तारीखही ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
३) लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी, करदात्यास १ लाखापर्यंतचा सेल्फ असेसमेंट टॅक्स भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर सेल्फ असेसमेंट टॅक्सची रक्कम १ लाखापेक्षा जास्त असलेल्या करदात्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, हे देखील आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
४) आयकर कायद्यानुसार कलम ८०सी नुसार (एलआयसी, पीपीएफ, एनएससी इ.), ८० डी (मेडिक्लेम), ८० जी (देणगी) यांच्या वजावटीसाठी दावा करण्यासाठी विविध गुंतवणूक/पेमेंट करण्याच्या तारखेत ३१ जुलै पर्यंत आणखी वाढ करण्यात आली आहे.
५) कर भरण्याच्या विलंब शुल्कावर कमी करण्यात आलेला ९ टक्के व्याज दर ३० जून २०२० नंतर केलेल्या भरण्यावर लागू होणार नाही