पुणे – पुणे महापालिका हद्दीतील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल बसच्या अनुदानित (सवलत) पासच्या वितरणाची मुदत दोन महिने वाढविण्यात आली आहे. यामुळे शहरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी अनुदानित पासचा लवकरात-लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन पास विभागाने केले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) शैक्षणिक वर्ष 2019-20 या शैक्षणिक वर्षात अनुदानित पास वितरण केले जात आहे. यासाठी, 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढविली आहे.
याबाबत महापालिकेच्या शिक्षण मंडळानेही मुदत वाढविण्याच्या सूचना केलेल्या होत्या. या संदर्भात, शहरातील विविध बसस्थानकांमध्ये अनुदानित पास योजनेबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
पास योजना
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल पास सेवा पुरविते. यामध्ये खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलत देऊन पास दिले जातात. तर, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पासची सेवा पुरविण्यात येते. याचबरोबर 25 वयोगटापर्यतच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीने पास दिले जातात. दरवर्षी शहरातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास या योजनेंतर्गत पीएमपीएमएल पास उपलब्ध करून देत असते.
पीएमपी बसच्या अनुदानित पास योजनेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. पासची सेवा मनपा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक बचत करणारी आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन पासची मुदत पुढील दोन महिने वाढविल्याने विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.
– आबासाहेब साळुंखे, पास विभाग प्रमुख, पीएमपीएमएल