अमरावती : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे, याबाबतचे प्रसिध्दिपत्रक राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रसिध्द केले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विधान परिषद अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून श्रीकांत गोविंद देशपांडे वैधरीत्या नामनिर्देशित अधिकृत उमेदवार आहेत.
विधान परिषद अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून श्री.श्रीकांत गोविंद देशपांडे वैधरीत्या नामनिर्देशित अधिकृत उमेदवार आहेत. श्री.चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताहेत. pic.twitter.com/xw6J6KEAl7
— NCP (@NCPspeaks) November 27, 2020
चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताहेत. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी केलेली कृती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिस्त भंग करणारी असल्याने प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे.