पाटणा – भारतीय जनता पक्षाने आज बिहारमधील विधान परिषदेतील आपल्या पक्षाचे आमदार टुन्नाजी पांडे यांची भाजप मधून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जाहीर टीका केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी त्यांच्या हकालपट्टीचा आदेश जारी केला. त्यांच्या विधानामुळे बिहारमध्ये सत्तारूढ आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. याबद्दल पांडे यांना नोटीसही जारी करण्यात आली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत नितीशकुमारांवर टीका सुरूच ठेवली होती.
भाजप श्रेष्ठींच्या सुचनेवरूनच ते हे टीका करीत आहेत असा समज सत्तारूढ आघाडीत त्यामुळे निर्माण होत होता. भाजपने मला जरी पक्षातून काढले तरी मी माझे घर चालवण्यासाठी भाजपवर अवलंबून नाही असे विधानही पांडे यांनी केले होते.
आपण नितीशकुमार सरकारच्या विरोधात बोलतच राहु. लोकांपुढे सत्य मांडणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असेही त्यांनी नमूद करून भाजपलाच आव्हान देण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.