पुणे : अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी हा आदेश दिला आहे. त्याबरोबरच मुलीनेही गाडीत बसण्यास विरोध केला नाही. तसेच, या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत. यावरून आरोपीने अपहरण व विनयभंग केल्याचे सिध्द होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
त्या तरूणाच्या वतीने न्यायालयात ऍड. श्रीधर एस. हुद्दार यांनी बाजू मांडली. ऍड. श्रीधर हुद्दार युक्तीवादात म्हणाले, आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत ही घटना येत नाही.
यावेळी त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले. त्या मुलाने 17 वर्षीय मुलीला तिच्या वाढदिवसादिवशी कारमध्ये घेऊन जावून प्रेम व्यक्त केले व लग्नास मागणी केली.
यावरून भोसरी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 363 (पळवून नेणे) आणि 354 (ड) विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 11 आणि 12 नुसार पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. 2019 मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. वाढदिवसाच्या दिवशी आणि त्यापूर्वीही त्याने प्रेम व्यक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.