शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. नगर जिल्ह्याच्या विकासात उपनेते अनिल राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अकाली जाण्याने नगरकरांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
शंकरराव गडाख
जलसंधारणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणारा नेता म्हणून अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील. त्यांच्या निधनाचे वृत सर्वानाच धक्कादायक आणि तेवढेच वेदनादायी आहे. आपल्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीत संघर्ष करून सामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. एका विचारांशी बांधिलकी मानून त्यासाठी अखंडपणे लढा देणारे नेतृत्व जनसामान्यांमध्ये त्यांनी निर्माण केलेले नाते न विसरता येणारे आहे.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
ज्येष्ठ नेते भाजप.
नगर जिल्ह्यातील एक अग्रगण्या नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले. या व्यक्तिमत्वाने घेतलेला अखेरचा निरोप संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी वेदनादायी आहे. राठोड परिवाराच्या दु:खात आम्ही सर्वचजण सहभागी आहोत.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील
नगर लोकसभा मतदारसंघ.
अतिशय दुःख झाले आहे. नगर शहर एका झुंजार नेत्याला मुकला आहे. नगर शहरांमधून ते सलग पाच वेळा विधानसभेत निवडून गेले. एक लढवय्या नेता म्हणून नगरकर त्यांच्याकडे नेहमी पाहत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक या नात्याने अहमदनगर शहरात मी येत असे त्यावेळेला त्यांच्याशी राजकारणावर चर्चा होत असे. त्यांच्या मताशी ते ठाम असत. घेतलेला निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलायचा नाही, अशी त्यांची भूमिका मी नेहमी पाहिली. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होणार आहे.
अंकुश काकडे
निरीक्षक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
एकनिष्ठ कार्यकर्ता आणि लोकनेता नेता कसा असावा, याचे अनिलभैय्या राठोड मुर्तीमंत उदाहरण होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. खांद्यावर घेतलेला भगवा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला, हीच त्यांची एकनिष्ठता आहे. सामान्य माणसाचे ते जननायक होते. अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून येऊन त्यांनी शहरातील जनतेच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने नगर शहराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राठोड परिवार व शिवसैनिकांच्या दुःखात मी सहभागी आहे.
आमदार संग्राम जगताप
नगर शहर विधानसभा.
अनिलभैय्या राठोड यांच्या नावाचा नगर शहरातील सर्वसामान्य माणसालाही आधार होता. त्यांच्या अकाली जाण्याचे दु:ख संपूर्ण नगर शहरालाही आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती देवो.
बाबासाहेब वाकळे
महापौर, अहमदनगर
समाजनिष्ठ, धर्मनिष्ठ अन् राजनिष्ठ नेता हरपला आहे. चाळीस वर्षांपासून आम्ही दोघे राजकारण व सामाजिक कार्यात एकत्र होतो. माझा स्नेही देहत्याग करुन प्रभु रामचंद्रचरणी विलीन झाला. त्यांच्या पूर्वस्मृतीनी मन भरुन आले आहे.
प्रा. मधुसूधन मुळे
ज्येष्ठ नेते, भाजप
अनिलभैय्यांच्या निधनाने नगर शहरातील जनसामान्यांचा आधार हरपला. ते कट्टर हिंदुत्ववादी नेता होते. नगरकरांनी 25 वर्षे त्यांच्यावर खूप प्रेम केले. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. आज मंदिराचे भूमिपूजन होत असताना ते पहायला अनिलभैय्या हवे होते.
दिलीप सातपुते
शिवसेना शहरप्रमुख, नगर.