पुणे – आज सकाळी कसबा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली.मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कसबा मतदार संघामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. “लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले” अशा भावना रवींद्रधंगेकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केल्या.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रमुख पेठांमध्ये धंगेकर यांनी चांगलच लीड मिळवल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या विजयाची आता सुरुवात झाली आहे असं धंगेकर यावेळी म्हणाले.तसेच भाजपला जनतेने कात्रजचा घाट दाखवला आहे असं स्पष्ट मत यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केले.
हा लोकशाहीचा विजय आहे. तसेच मी सर्वसमावेशक राजकारण केल्यामुळे हे चित्र दिसले आहे कालच पत्नीने विजयाची खात्री व्यक्त केली असल्याचे देखील रवींद्र धंगेकर यांनी यावेळी म्हंटले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवार आहे. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हाती आला. तर दुपारी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान झाले. यामध्ये 50 टक्के इतके मतदान झाले होते.