- पाच तरुणींची सुटका
- गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी दत्त मंदिर रोड वाकड येथे एका स्पा सेंटरवर छापा मारला. स्पा सेंटरमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उघडकीस आणून पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी करण्यात आली.
विशाल पवनकुमार अग्रवाल (रा. पाचपीर चौक, काळेवाडी), आबासाहेब भाऊसाहेब तागड (रा. पिंपळे गुरव) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्त मंदिर रोड, वाकड येथे फॉरेव्हर स्पा झोन स्कीन केअर या सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून माहितीची खात्री केली. वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली.
आरोपी तिघेजण हे स्पा सेंटर भागीदारीत चालवत होते. स्पा सेंटर चालविण्याचे प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे आढळून आले नाही. या कारवाईमध्ये सहा मोबाइल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 250 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम 370, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.