एकास अटक, दोन युवतींची सुटका
लोणावळा – येथील खत्री पार्क सोसायटीमधील एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण पथकाला यश मिळाले. महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी एकास अटक केली, तर दोन युवतींची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खत्री पार्क सोसायटी उच्चभ्रू वस्तीमध्ये एक व्यक्ती महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, रऊफ इनामदार, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सुरेखा कोरफड यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खत्री पार्क सोसायटीमधील शिवतीर्थ बंगला क्रमांक दोनमध्ये छापा टाकत सखाराम तुकाराम पाटील (वय 39, रा. खत्री पार्क सोसायटी, वलवण, लोणावळा) याला अटक केली.
पाटील याला वडगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.