अलिशान “रो हाऊस’मध्ये सुरू होता व्यवसाय
बारामती- शहरातील संभाजीनगर भागात अतिशय अलिशान ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला. याठिकाणाहून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. एका शिक्षित जोडप्याकडून हा व्यवसाय करुन घेतला जात होता. या दोघांविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार, सहाय्यक निरीक्षक गणेश लोहकरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार, हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, हवालदार राजेंद्र जाधव, दत्तात्रय मदने, जगदीश चौधर यांनी ही कामगिरी केली.
शहरातील संभाजीनगर येथील अर्बनग्राम सोसायटीतील एका रो हाऊसमध्ये हा व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांनी सोमवारी दुपारी तेथे छापा मारला असता हे जोडपे दोन मुलींकडून स्वतःच्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करुन घेताना आढळून आले. कमाईतील काही हिस्सा पीडित मुलींना दिला जात होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली आहे.