“राष्ट्रवादीला माण-खटावमधून हद्दपार करा’

ये शेखर गोरे कौन है?

फलटणच्या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर दाद मागू दिली नाही त्यावेळी जो गोंधळ उडाला तो राज्याबरोबरच देशभरात गाजला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले ये शेखर गोरे कौन है… त्यामुळे आपले नाव दिल्लीपर्यंत पोहचले आहे. त्यावेळचा तो राडा नव्हता तर न्याय मागण्याचा प्रकार होता. मात्र याच राष्ट्रवादीने त्यावेळी दडपशाही दाखवून न्याय मागून दिला नाही.

गोंदवले निष्ठतेने काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीला कदापी चालत नाही, अशा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणाऱ्या राष्ट्रवादीला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. माण खटाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा शेखर गोरे यांनी दिला आहे. औंध जि.प.गटात माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेद्वाराच्या प्रचारादरम्यान कोपरासभेत ते बोलत होते. अलीमभाई मोदी, राजाभाऊ देशमुख, संदीप इंगळे, वसंतराव गोसावी, धनाजी आंबे, प्रकाश महंत, सावता यादव, गणेश चव्हाण, विनोद कदम, प्रदीप गुजर, चंद्रकांत पवार, मंगेश इंगळे तसेच औंध जि. प. गट व गणातील आदी प्रमुख कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

शेखर गोरे म्हणाले, अस्तित्व संपत चाललेल्या राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून सर्व सत्तास्थाने ताब्यात आणून दिली तरी या राष्ट्रवादीचे भागले नाही. विधानपरिषद निवडणूकीत मला जाणीवपूर्वक पाडण्याचे काम पक्षातीलच गद्दारांनी केले. विरोधकांच्या बरोबरीने याच गद्दारांनी मला मोका लावण्यासाठीही प्रयत्न केले. त्या गद्दरांच्या कृत्याचा पाढा पवार साहेबांसमोर मांडूनही त्यावर एकही शब्द ही न बोलणाऱ्या साहेबांना महानच म्हणावे लागेल. त्यांच्या या दुटप्पीपणामुळेच आज पक्षावर ही वेळ आली आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना माण-खटावचा आमदार राष्ट्रवादीचा नको आहे. मतदारसंघ विरोधकांकडे गेला तरी चालेल पण राष्ट्रवादीकडे येता कामा नये. यासाठी गटातटाच्या राजकारणात गुंतवून टाकायचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. अन्यायाविरोधात न्याय मागून तो मिळत नसेल तर त्या पक्षात राहून तरी काय फायदा? म्हणूनच मी कार्यकर्त्यांना विचारात घेत भाजपाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करूनही अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीला येणाऱ्या काळात माण खटावमध्ये त्यांची जागा दाखवून देऊन हद्दपार करून टाका असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.