पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : नवरात्रौत्सवात पूर्वी केळीचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जायचे. मात्र, अलिकडे बदलत्या काळानुसार पॅकिंग फुड वाटपचा फटका केळीला बसला आहे.
चिक्की, राजगिरासह विविध उपवासाच्या पदार्थ्यांचे वाटप केले जाते. याचा परिणाम मार्केट यार्डातील केळी विभागातील व्यापारावर झाला आहे. ऐन उपवासाच्या काळातही केळीची आवक कमी होत आहे.
गुरूवारी (दि.३) नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवाच्या आठवडा आधी मोठी आवक होत होती. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नाही. आवक घटली आहे. सध्या येथील बाजारात दररोज १० ते १५ पिकअप आवक होत आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, इंदापूर, भिगवण भागासह सोलापूर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. घाऊक बाजारात किलोस १२ ते १६ रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये डझनने तयार मालाची विक्री होत आहे. जिल्ह्यासह विभागात यंदा पाऊसाने हजेरी लावली आहे. याचा फटकाही केळीच्या दर्जावर झाला आहे.
नवरात्रौत्सव काळात पूर्वीसारखी आवक होत नाही. मागणीही कमी आहे. दर्जाहिन माल बाजारात दाखल होत आहे. सध्या आवक वाढण्याची शक्यता नाही. महिना ते दीड महिन्याने नवीन माल बाजरात येईल. त्यावेळी आवक वाढण्याची शक्यता आहे. विठ्ठल वायकर, केळीचे व्यापारी, मार्केट यार्ड
का होतेय दर्जाहिन मालाची आवक
उत्तम प्रतीच्या मालाची परदेशात निर्यात होत आहे. त्याच बरोबर नियमन मुक्तीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन चांगल्या मालाची खरेदी खरेदीदार, कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
दर्जेदार माल ते खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च होत नाही. परिणामी, बांधावर मालाची विक्री होत आहे. उर्वरित दर्जाहिन माल बाजारात येत आहे.