नवी दिल्ली : कांदा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कांदा परदेशी निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे राज्यासह कांदा उत्पादन घेणाऱ्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते. कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी हा निर्णय मध्यंतरी केंद्राने घेतला होता. मात्र, यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कांदा उत्पदकाचे मोठे नुकसान झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने बाजारात कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अखेरीस केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले गेले आहे. एक एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे.उद्याच्या साप्ताहिक सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजारात आता कांद्याला काय बाजार भाव मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.