‘अंबानींच्या घरासमोर स्फोटके सापडणे, हे सहानुभूतीसाठीचे षडयंत्र’

तपास यंत्रणा काय करत होत्या? : राजू शेट्टी

पुणे – ‘अंबानींच्या घरासमोरच नेमकी स्फोटके कशी काय सापडतात? शेतकऱ्यांच्या रोषाला अंबानी पात्र ठरतात, त्यामुळे अंबानींबद्दल सहानुभूतीसाठी घडवलेले हे षडयंत्र आहे,’ असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शेट्टी श्रमिक पत्रकार संघात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

इतकी स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, पोलीस, केंद्रीय पोलीस, “रॉ’ काय करत होते, असा प्रश्‍न उपस्थित करत आमची मुंबई सुरक्षित नाही का, याचे उत्तर राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रीय गुप्तचर खात्याने द्यावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. याशिवाय सीबीआयने आता जरा बाकीच्या राजकीय कामांपेक्षा स्फोटके नेमकी कोठून आली? याचा तपास करण्याकडेही लक्ष द्यावे, असा टोलाही शेट्टी यांनी हाणला.

दिल्लीच्या आंदोलनाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. 26 नोव्हेंबरला आम्ही “चलो दिल्ली’चा नारा दिला होता. या तीन महिन्यांत अजूनही या विषयात मार्ग निघाला नाही. केंद्राची ही नामुष्की आहे. तीन महिने शेतकरी एका ठिकाणी बसून राहतात शेतकऱ्यांच्या काहीतरी वेदना आहेत, त्या केंद्र सरकार समजूनच घेणार नाही का? की अजूनही आमचे अडत नाही, आम्ही हे मोडून काढू, किती दिवस बसतील, असे सरकारला वाटत आहे?, असा प्रश्‍न शेट्टी यांनी विचारला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींचे काय झाले?
हिंसाचार करणारे जे लोक शेतकरी चळवळीत घुसले, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या तपासाचे काय झाले, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. हिंसाचार करणारे आपणच घुसवायचे आणि शेतकऱ्यांना मात्र खलिस्तानवादी, आतंकवादी ठरवायचे हे प्रकार आधी बंद करा. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे काय झाले त्याचे आधी उत्तर द्या, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.