झेंडेवाडीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट; एक किलोमीटरपर्यंत बसला मोठा हादरा

एक किलोमीटरपर्यंत बसला हादरा : हॉटेल, कारचे नुकसान

दिवे/सासवड – झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील झेंडेमळ्यात जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याने परिसरात मोठा हादरा बसला. या हादऱ्यामुळे दोन हॉटेल आणि एका कारचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जिलेटिन बेकायदा देणारा आणि स्फोट करणारा अशा दोघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी तीनच्या सुमारास तर गुन्हा रात्री 11.30च्या सुमारास दाखल करण्यात आला.

संशयित आरोपी गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव, ता. फलटण, जि. सातारा) व खाडे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे असून सरकला अटक करण्यात आली आहे.

तर कालिदास संपत झेंडे(रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कालिदास झेंडे यांच्या हॉटेलच्या मागे शेताच्या बांधावर विहिरीच्या कामासाठी जिलेटिनच्या कांड्या आणल्या होत्या; मात्र त्याचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे झेंडे यांचे मल्हार वाडा हॉटेल आणि शिवाजी विश्‍वास कटके यांच्या कारचे (एमएच 12 टी. एच 0812) मोठे नुकसान झाले आहे. तसेच सवाई हॉटेलच्या भिंतींना आतून तडे गेले आहे.

दरम्यान, संशयित आरोपी गणेशने बेकायदा जिलेटिनच्या कांड्या इंदापूर येथील खाडेकडून घेतल्या होता. जिलेटिनसारखा पदार्थ कोणतीही दक्षता न घेता हयगयीने ठेवल्यामुळे जिलेटिनच्या स्फोटाला आणि नुकसानीला कारणीभूत ठरल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.

रविवारी दुपारी मोठा आवाज ऐकू आला त्यानंतर आम्ही परिसराची पाहणी केल्यानंतर हॉटेल मल्हार गडच्या पाठीमागे स्फोट झाल्याचे कळाले यानंतर आमच्या हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलमधील भिंतींना देखील तडे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
– अजित गोळे, मालक, हॉटेल सवाई, झेंडेवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.