कोपनहेगन : डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये आज पहाटेच्या सुमारास इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट झाले. यामुळे या दूतावासाजवळच्या ज्यू शाळा खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आल्या. या दोन्ही स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे डेन्मार्कच्या पोलिसांनी म्हटले आहे. हे दोन्ही स्फोट रात्री 3.20 वाजण्याच्या सुमारास झाले.
या स्फोटांचा आणि कोपनहेगनमधील इस्रायली दूतावासाचा काही संबंध होता का, हे तपासून बघितले जाते आहे. मात्र या संदर्भात कोणाला अटक केली गेली का, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. स्फोट झाल्यानंतर लगेचच इस्रायली दूतावासाच्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली. तेथे बंदोबस्तासाठी सशस्त्र पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक आणि श्वानपथक देखील तपासासाठी तैनात केले गेले. दूतावासाला लागून असलेल्या रस्त्यावर ज्यू शाळा असून ज्यू नवीन वर्षानिमित्त या शाळेला गुरुवार आणि शुक्रवारी सुटी जाहीर झाली आहे.
शहरातल्या सेनगॉगचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्कता बाळगम्याची सूचना प्रसासनाकडून देण्यात आली आहे. स्फोटांच्या तीव्रतेबाबत अधिक तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. हे स्फोट घडवणाऱ्यांच्या हेतूविषयी आताच काहीही सांगितले जाऊ सकणार नाही, असे डेन्मार्कचे न्यायमंत्री पीटर हमेलगार्ड यांनी सांगितले.