लेबननची राजधानी बैरुतमध्ये स्फोट

100 जणांचा मृत्यू तर 4000 लोकं जखमी

बैरुत : लेबननची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात बुधवार सकाळपर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000 लोकं जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैरूतचे गर्व्हनर मार्वां एबाॅड यांनी बुधवारी सांगितले की, या स्फोटामुळे शहरातील 3 लाख लोक बेघर झाले आहेत. अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या स्फोटात 3 बिलियन डाॅलर (22,450  कोटी रूपये) पेक्षा नुकसान झाले आहे.

लेबननचे पंतप्रधान हसन डायब यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजमध्ये 2,750 टन स्फोटक अमोनियम नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवले गेले होते. त्यांचा स्फोट झाला. हा स्फोट एखाद्या भूंकपासारखा होता. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला तसेच सुमारे 240 किलोमीटर दूर पूर्वेच्या भूमध्य भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला.

लेबननच्या कस्टम विभागाने या घटनेसाठी थेट पोर्ट चीफला जबाबदार धरले आहे. कस्टम हेड बादरी दहेर म्हणाले की, अमोनियम नायट्रेट ठेवण्यासाठी माझा विभाग जबाबदार नाही. पण स्फोट यामुळेच झाला आहे. या घटनेस पोर्ट चीफ हसन कोरेटेम जबाबदार आहेत. यावर पोर्ट चीफ यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

नेमकं काय घडल मंगळवारी रात्री…

मंगळवारी रात्री राजधानी बैरुत येथे मोठा स्फोट झाला. किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या जहाजमध्ये स्फोट झाला. जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या तीन मजल्यांपर्यंत वर उडाल्या. तसेच बाजूच्या बिल्डिंग क्षणार्धात कोसळल्या. अवघ्या 12 सेकंदात शहर उध्दवस्त झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैरुतमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बुधवारी सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले,  बैरुतमध्ये झालेल्या स्फोटाची बातमी ऐकून मला वाईट वाटले. अनेक लोकांनी यात प्राण गमावले आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. या स्फोटात मृत्यू आणि जखमी झालेल्यांसाठी आम्ही संवेदना व्यक्त करतो.

हा स्फोट नसून भयंकर हल्ला… 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्फोटांना एक भयंकर हल्ला असे संबोधले आहे. म्हणाले- हा स्फोट अत्यंत भयानक हल्ल्याचा प्रकार दिसत आहे. या कठीण काळात आम्ही लेबनन सरकारबरोबर उभे आहोत. त्यांना आम्ही या घटनेच्या तपासणीत मदत करू इच्छित आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.