द हेग (नेदरलॅन्ड) – नेदरलॅन्डमधील एका छोट्या गावातल्या करोना विषाणू चाचणी केंद्रात आज एक स्फोट झाला. या स्फोटामुळे चाचणी केंद्राच्या खिडक्यांची तावदाने उद्ध्वस्त झाली. मात्र या स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
हा स्फोट ऍम्स्टरडॅमच्या उत्तरेला 60 किलोमीटर अंतरावर बोवेंकारस्पेल येथील करोना विषाणू चाचणी केंद्रात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. पोलिसांनी या परिसराची पूर्ण नाकाबंदी केली आहे. या स्फोटामागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
या विषाणू चाचणी केंद्राला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवला गेला होता का, याचाही शोध घेतला जात आहे. या स्फोटामागे घातपात अथवा अपघात यापैकी काय कारण असावे, हे शोधले जात आहे. या स्फोटानंतर हे चाचणी केंद्र बंद करण्यात आले असून ते पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता आहे.
नॉर्थ हॉलंड प्रांतात गेल्या काही आठवड्यात करोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. येथील रुग्णसंख्येचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नेदरलॅन्डमध्ये सध्या देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात काही समाज कंटकांनी उर्क गावातील करोना चाचणी केंद्र उद्ध्वस्त केले होते. काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्लेही केले गेले आहेत. याशिवाय गेल्या वर्षी तब्बल 1,100 आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि हल्ल्यांच्याही घटना घडल्या आहेत.