नवी दिल्ली – सौदी अरबमधील महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या एका सुप्रसिध्द महिलेला तेथील यंत्रणेने सहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. लुजेन अल हथलोल असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अडीच वर्षांपासून तुरूंगातच असल्याचे तेथील माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे.
सौदी अरबमधील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करणाऱ्या महिलांत अल हथलोल आघाडीवर होत्या. त्या देशात महिलांना वाहन चालवण्याच्या संदर्भात जो कायदा आहे, तो महिलांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे हथलोल यांचे म्हणणे होते व त्या विरोधात त्यांनी आपला आवाज बुलंद केला होता.
बदलासाठी आंदोलन, विदेशी अजेंडा राबवणे, सार्वजननिक व्यवस्थेचे नुकसान करण्यासाठी इंटरनेटचा वापर असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, दहशतवाद विरोधी कायद्याखाली ज्यांना दोषी ठरवण्यात आले आहे, तो लोकांना मदत केल्याच्या आरोपांतही हथलोल यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार हथलोल यांच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या मुलीची तुरूंगात छळवणूक सुरू असून तिला कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याशी बोलू दिले जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हथलोल यांना वीजेचे झटके दिले जात असून, चाबकाचे फटकेही दिले गेले असल्याचे व त्यांचे लैंगिक शोषणही केले जात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे. मात्र न्यायालयाने या सगळ्यांचा इन्कार केला आहे.
हथलोल गेली दोन वर्षे दहा महिन्यांपासून तुरूंगात असून त्यांच्या या शिक्षेचा कालवधी आताच्या सहा वर्षांच्या शिक्षेत धरला जाणार आहे. तसेच निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली आहे.