श्रीहरीकोटा – श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपणस्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, म्हणजेच इस्रोच्या “पीएसएलव्हीसी 51 या रॉकेटचे आज सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले.
प्रक्षेपणानंतर दिड तासानंतर हे सर्व उपग्रह एकापाठोपाठ एक वेगळे झाले. सुमारे 10 मिनिटांमध्ये या सर्व उपग्रहांनी आपली कार्यकक्षा व्यवस्थित गाठली. या रॉकेटद्वारे ब्राझिलचा ऍमेझॉनिया-1 हा मुख्य उपग्रह आणि इतर 18 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
या उर्वरित 18 उपग्रहांमध्ये स्पेस किड्स इंडियाने तयार केलेला सतीश धवन सॅट आणि तीन महाविद्यालयांनी तयार केलेला युनिटी सॅट या उपग्रहांचा समावेश आहे. स्पेस किड्स इंडियाच्या सतिश धवन उपग्रहामध्ये “एसडी’कार्डमध्ये भगवत गीताही बसवण्यात आली आहे. या उपग्रहावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमाही मुद्रीत करण्यात आली आहे.
ऍमेझॉनिया-1 उपग्रहाला अवकाशात सोडण्याची ही मोहीम, अवकाश विभागाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या कंपनीची पहिलीच व्यावसायिक मोहीम आहे. तर इस्रोची देखील यावर्षीची ही पहिलीच मोहीम आहे.
ऍमेझोनिया-1 हा 637 किलो वजनाचा उपग्रह असून भारतातून प्रक्षेपित करण्यात आलेला ब्राझीलचा पहिलाच उपग्रह आहे. ब्राझीलमधील वैविइध्यपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आवश्यक हवामान निरीक्षण करणे हे या उपग्रहाचे मुख्य काम असणार आहे.
अवकाश क्षेत्रात ब्राझील भारताबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे ब्राझीलचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मार्कोस सीझर पोर्टेस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएसएलव्ही-सी 51/ऍमेझोनिया-1 मिशनच्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल “एनएसआयएल’ आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.
या मोहिमेच्या यशस्वितेमुळे देशातील अंतराळ सुधारणांच्या नव्या युगाची सुरुवात झाली झाले. 18 उपग्रहांमध्ये चार छोट्या उपग्रहांचा समावेश होता. जे आमच्या तरूणांचा उत्साह आणि नवोन्मेशाचे प्रदर्शन घडवत आहेत, असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.
“पीएसएलव्ही-सी 51′ या रॉकेटद्वारे ब्राझीलच्या ऍमेझोनिया-1 उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो यांचेही अभिनंदन केले. उभय देशातील अंतराळ सहकार्यातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ब्राझीलच्या वैज्ञानिकांना माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील दुसऱ्या संदेशात म्हटले आहे.