शिक्षक उपसंचालक प्रवीण आहिरे : रखडलेल्या वैद्यकीय बिलांचाही आढावा
सोमाटणे – पुणे विभागातील कोणत्याही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार यापुढे उशिरा होणार नाहीत. शालार्थ आयडी मिळाले नाही, त्यांचे आयडी मिळतील त्यामुळे डिसेंबरपर्यंत “ऑफ लाइन’ पगाराला मुदत वाढ दिली जाईल. यापुढे पगार वेळेतच होतील. तर शिक्षकांची रखडलेली वैद्यकीय बिलांना त्वरीत मंजुरी दिली जाईल, असे प्रतिपादन पुणे शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी केले.
पुणे, सोलापूर व अहमदनगर येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या कौन्सिल सदस्यांची सभा पुणे जिल्हा मुख्याध्यापक भवन पुणे येथे झाली. या सभेत पुणे, सोलापूर, अहमदनगर येथील शाळांचे शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा प्रवीण अहिरे यांच्यासमोर वाचण्यात आल्या.
ज्या शिक्षकांचे शालार्थ आय.डी. मिळाले नाहीत, त्यांना वेतनासाठी अडचणी येणार असल्याने अहिरे यांनी “ऑफ लाइन’ पगारासाठी एक महिना मुदतवाढ दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच डीसीपीएस बाबतही लवकरच एन.पी.एस.च्या आधारे खाते क्रमांक न बदलता निर्णय घेतला जाईल. शैक्षणिक सहलीच्या अटी काही प्रमाणात शिथिल केल्या जातील. त्यामुळे यापुढे मुख्याध्यापकांनी मुलांच्या सहली थांबवू नयेत असेही आवाहन केले.
तसेच विनाअनुदानित व अनुदानित समायोजन कॅम्प तारखा आजच्या सभेत जाहीर करण्यात आल्या. पेन्शन, पीएफ, प्रलंबित मेडिकल बिले आदीबाबत यापुढे विलंब होणार नाही. याबाबत एक कार्यपद्धती लवकरच निश्चित करणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.
या सहविचार सभेस पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, लेखाधिकारी घंटी, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आदिनाथ थोरात, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव रंगसिद्ध दसाडे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त अरूण थोरात, शिवाजीराव किलकिले राजेश गायकवाड आदी उपस्थित होते. या सभेचे प्रास्तविक पुणे विभाग अध्यक्ष शांताराम पोखरकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत मोहोळ यांनी तर सचिव मन्मंथ उकरंडे यांनी आभार मानले.