विविध कंपन्यांचा सहभाग ः शेतीसंबंधी माहिती उपलब्ध
माळेगाव -बारामती येथील कृषिक 2020 च्या प्रदर्शनाला महाराष्ट्र व विविध राज्यांसह देशविदेशातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी यासह शेती उपयोगी आधुनिक नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकांसह माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण काम या प्रदर्शनातून करण्यात येते.
या प्रदर्शनातून शेतीबरोबरच शेती संलग्न व्यवसायासाठी उपयुक्त असणाऱ्या पशूपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासंबंधिही शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सौर ऊर्जासह हवे वरील शेती, कमी खर्चात शेती, फळबाग लागवड, लाकडाचे घर यासह दुग्धउत्पादन फळप्रक्रिया कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
या प्रदर्शनात देशातील सर्वाधिक लहान असणाऱ्या दोन फूट तीन इंच व तीन फूट उंचीच्या गाई मूळच्या आंध्र, केरळ ,तामिळनाडूमध्ये आढळणाऱ्या गायी आकर्षक ठरत आहेत. पशुपक्षी प्रदर्शनात तिनदा महाराष्ट्र केसरी झालेला मालेगावचा पिंटू घोडा तसेच खिल्लार व दानी गाय, बैल दोन लाख रुपये किमतीला मागणी करण्यात आलेली अकरा महिन्यांची खिलार जातीची कालवड, शेळीच्या आठ दाती जातीचे बोकड, राजस्थानचे कोटा बोकड व बोर तसेच बायक वळू आणि शो साठी वापरला जाणारा देवणी वळूचे प्रदर्शन पाहायला शेतकरी गर्दी करत आहेत.
विविध नावलौकिक कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था खते, बियाणे कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, विविध प्रक्रिया उद्योग ठिबक व तुषार आणि ग्रीन हाऊस मधील तंत्रज्ञानातील बहुसंख्य कंपन्या सहभागी झाल्या आहेत.