मका बियाणातच कीड निर्मितीचा प्रयोग

  • राजगुरूनगरातील शेतकऱ्यांचा आरोप : पिकावर अज्ञात किडीचा प्रादुर्भाव

राजगुरूनगर – राजगुरुनगर परिसरात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कणीस लागण्याधीच मक्‍याचा कोंब अळी खात असल्याने वाढ रखडली आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांनी हा निसर्गाचा नव्हे तर मका बियाणातच कीड निर्मितीची प्रयोग झाल्याचा आरोप केला आहे. खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. यावर्षी तालुक्‍यात सुमारे 5 हजार हेक्‍टर क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर मक्‍याची लावगड करण्यात आली असून बियाणाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने जवळपास 2 हजार रुपये किलो ने बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.

राजगुरूनगर परिसरात मका पिकावर एका विशिष्ट प्रकारच्या अळीने हल्ला चढवला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या मका जवळपास दोन ते तीन फूट उंच आले आहे. मात्र, पिकाच्या गाभाऱ्यात पानांच्या रोलमध्ये या अळीची अचानक वाढ होत असून ती मक्‍याचा कोंबच खात असल्याने पिकाची वाढ होत नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या लक्षात आणून देवून किडीचे व्हिडीओ सादर केले आहेत; मात्र त्यांच्याकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसे मार्गदर्शन होत नाही. जर जमीन कसदार आहे तर कीड कशी काय तयार झाली हा संशोधनाचा विषय बनला आहे.
औषधांचा काही उपयोग नाही
कोहिनकरवाडी, सांडभोरवाडी, सातकरस्थळ बुट्टेवाडी, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, कडूस, चास, दोंदे, शिरोली पाईट या परिसरात मोठ्या मका पिक अळीच्या भक्षस्थानी पडले आहे. मक्‍याच्या कोंबात असलेली अळी नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असून चुन्याची निवळी-निरमापावडर, रासायनिक औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र ही कीड औषधांनी मारत नाही. ती मक्‍याच्या नव्या कोंबाच्या आत पानात दडलेली असल्याने तिच्यावर औषधांचा उपयोग होत नाही. या किडीचे प्रमाण वाढतच चालले आहे.
कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मक्‍यात किडीचे प्रमाण जास्त आहे वातावरणातून आणि जमिनीतून ही कीड तयार झाली नसून ती बियाणातूनच आली आहे. पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या या आळ्या असून त्या मक्‍याच्या कोंबातुन बाहेर काढल्यानंतर काही सेकंदात मरून जातात. मका मात्र उद्‌ध्वस्त करतात. केमिकल खाण्यासाठीही कीड निर्मिती होत आहे. मक्‍याचा गाभा कुरतडत आहे. यात एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे. याबात तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कृषी अधिकारी याची दखल घेत नाही. बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मका उत्पादक शेतकरी कुंडलिक कोहिनकर, पांडुरंग कोहिनकर, माणिक मुळे यांनी केली आहे.
कृषी विभाग अनभिज्ञ
राजगुरुनगर येथील कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याशी संपर्क केले मात्र त्यांना या किडीबाबतर व ती नष्ट करण्याच्या औषधांबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.