जळोची – येथील विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार ही बेंगळुरू येथील “इस्रो’च्या नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसून चांद्रयान 2 मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेणार आहे.
“इस्रो’ने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जाणीव जागृती वाढवण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. यामध्ये पाच मिनिटांत 20 प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने सिद्धीला 100 पैकी 100 गुण मिळाले. या प्रश्नमंजूषेमध्ये महाराष्ट्रातून तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आहे.सिद्धी पवार ही बालविकास मंदिर शाळेतील अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन तिने आतापर्यंत घवघवीत यश मिळवले आहे.
इस्रोने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याचे समजल्यानंतर विश्वासच बसला नाही. सिद्धीच्या या यशानंतर आपला आनंद गगनात मावत नाही. तसेच आता पंतप्रधानांच्या उपस्थित होत असलेल्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.
– दिपाली पवार, सिद्धीची आई