14 प्रकारचे वेगवेगळे उद्यान तयार : नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक
पुणे – औषधी वृक्ष, राशी, नक्षत्र आणि ग्रह यांची वृक्ष, फळ, फुले, मसाले यासह दुर्मिळ होत चालेल्या वृक्षांसह तब्बल 14 हजार वृक्षांचे नंदनवन शहराच्या मध्यभागी असलेल्या गोखलेनगर येथील मेंढी फार्ममध्ये साकारलेले आहे. हे नंदनवन विद्यार्थ्यांना विविध जाती-प्रजातींच्या वृक्षांची माहिती देणारे आहे. आपण कधीही न पाहिलेले वृक्षही याठिकाणी पाहता येणार आहे. स्वच्छ हवा, हिरवेगार सौदर्य, डोंगरावरून येणारे पाणी अशा विलक्षण निसर्गाचा अनुभव नागरिकांना पावसाळ्यात अनुभवता येणार आहे.
भांबुर्डा वनविभागातील ही जागा पूर्वी एका कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आली. करार संपल्यानंतर हा परिसर दिवसेंदिवस बकाल होत चालला होता. त्यामुळे अस्वच्छता वाढली आणि नैसर्गिंक सौदर्य खराब होऊ लागले. त्यावेळी आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून या 14 एकर जागेत वन उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्य शासनाकडून दीड कोटींचा निधी देण्यात आला. त्यानंतर 3 जुलै 2018 रोजी या उद्यानाच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभरात वर्षभरात 80 टक्के उद्यानाचे काम पूर्ण केले असून दुसऱ्या टप्प्यात उरलेली सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामध्ये निसर्ग सौदर्य, वृक्ष यासह नागरिकांसाठी जॉगिंक ट्रॅक असणार आहे. तसेच दरवर्षी डोंगर भागातून येणारे पाणी वस्तीमध्ये जाऊ नये यासाठी उद्यानातच तलाव बांधण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी दिली.
उद्यानाचे वैशिष्ट्ये
14 एकरमध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे उद्यान याठिकाणी तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आयुष वन, लुप्त होणाऱ्या प्रजातींचे वन, गणेश वन, सुगंधी वन, नवग्रह वन, पंचवटी वन, औषधी वन, नक्षत्र वन, फळ उद्यान, वड जातींच्या वृक्षांचे उद्यान, पाम उद्यान, उपयुक्त प्रजातींचे उद्यान, स्मृती वन, बांबू वन, किचन बाग वन यांचा समावेश आहे. एकूण 14 हजार वृक्ष आणि वेलींची लागवड करण्यात आली आहे.
सहलीसाठी आणि माहिती केंद्र म्हणून महत्त्वाचे
नागरिक विशेषतः विद्यार्थ्यांना पर्यावरणाची ओळख व्हावी यासाठी निसर्ग परिचय केंद्र या उद्यानात आहे. तसेच खुले सभागृह, चित्रफिती दाखविण्याची सुविधा, विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी साहसी खेळ, मैदानी खेळ, प्राण्यांच्या प्रतिकृती व खेळांचे साहित्य याठिकाणी आहेत. मतिमंद विद्यार्थ्यांना स्पर्शाने वृक्ष कळावे यासाठी स्वतंत्र विभाग, व्यायामासाठी ओपन जिम, योग केंद्र, फिरिण्यासाठी निसर्ग पाऊलवाटा, बसण्यासाठी कठडे व मनोरे उभारण्यात आले आहे.
उद्यानात चार ठिकाणी वन तलाव
हे उद्यान भांबुर्डा वनक्षेत्रात उभारण्यात आले असून, पावसाळ्यामध्ये डोंगरातून खाली येणारे पाणी एकाच ठिकाणी साठवून ते उद्यानात तयार केलेल्या तलावामध्ये सोडण्यात आले आहे. याच पाण्याचा वापर येथील उद्यानासाठी करण्यात येणार आहे. ओढे, नाले यांना दगडी पिचिंग करून नागरिकांना पाणी अडविण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. जमिनीची धूप थांबविणे आणि पाणी अडविण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर गॅबियन वॉल उभारण्यात आली आहे. तसेच लाकडी आभासाचे पूल, आकर्षक भित्तीचित्रे, रंगीबेरंगी फुले, विविध प्रकारचे गुलाब, धबधब्यांचा अनुभव घेता येणार आहे.