9438 लाभार्थी : लॉकडाऊनच्या काळातही दिव्यांगांना लाभ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 मार्च ते 21 ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत 9 कोटी 72 लाख 35 हजार 327 रुपये खर्च करण्यात आला आहे. महापालिकेने या घटकासाठी केलेल्या एकूण 27 कोटी 16 लाखांच्या तरतुदीपैकी 18 कोटी 77 लाख, 23 हजार 417 रुपये अद्यापही बाकी आहेत. लॉकडाऊनच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेला हा सर्वाधिक खर्च उल्लेखनीय आहे.
मार्च महिन्यात करोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढू लागली. करोनावर नियंत्रण आणण्यासाठी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपविण्यात आली. करोनामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न कमालीचे घटले. महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊ लागल्याने महापालिकेत सर्वसामान्य नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली.
करोनाचा फटका महापालिकेच्या सर्वच विभागांना बसल्याने विकासकामांना खीळ बसली. अशा परिस्थितीत महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने शहरातील नि:समर्थ अपंग कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यात मोठी आघाडी घेतली. या काळात विभागाच्या वतीने सात योजनांचा शहरातील एकूण 9 हजार 438 जणांना लाभ दिला. यामध्ये 7 हजार 83 जणांना पंडित दिनदयाळ उपाध्याय अपंग पेन्शन योजनेकरिता सर्वाधिक 6 कोटी, 90 लाख, 94 हजार 440 रुपये खर्च करण्यात आले. त्याखालोखाल मतिमंद मुले अथवा व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या 2003 लाभार्थींना अर्थसहाय करण्यासाठी एकूण2 कोटी, 24 लाख, 25 हजार रुपये खर्च करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने अपंग घटकाकरिता राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लॉकडाऊनच्या काळातही या घटकाला मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अद्यापही 18 कोटींची तरतूद बाकी असून, या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत या सर्व तरतुदीचा या योजनांवर खर्च करण्यावर भर राहणार आहे.
– संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी