नगर – संपदा पतसंस्थेच्या बहुचर्चित 32 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात ज्ञानदेव वाफारे यांचे नाव संशयित मुख्य आरोपी म्हणून समोर आलेले आहे. त्यामुळे त्यांची काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदावरुन तसेच पक्षातूनही त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी केली असल्याची माहिती पक्षाचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी आज माध्यमांना दिली.
बाळासाहेब भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रदेश सदस्य श्याम वाघस्कर, पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, महिला शहर-जिल्हाध्यक्षा सविता मोरे, भिंगार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मार्गरेट जाधव, शहर-उपाध्यक्ष शशिकांत पवार व रवी सुर्यवंशी, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे व मुकुंद लखापती, युवक काँग्रेसचे अज्जूभाई शेख, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या त्या निवेदनावर सह्या असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. पटोले यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, सहप्रभारी वामसी रेड्डी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करुन 32 कोटींच्या ठेवी वसूल कराव्यात व त्यांचे ठेवीदारांना वाटप करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने यापूर्वीच दिला होता. त्याला वाफारे याने स्थगिती मिळविली. ही स्थगिती न्यायालयाने उठविली असून, वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याच कारणासाठी वाफारे यांनी काही महिने तुरुंगात काढले आहेत. गोर-गरीबांच्या ठेवी लुटणारे, अशी त्यांची प्रतिमा झाली आहे.
त्यात त्यांना जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस संघटनेत जिल्हा सरचिटणीस बनवून ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अशा भ्रष्ट प्रतिमेच्या लोकांना पदे देण्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, असा दावा करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ज्ञानदेव वाफारे यांची काँग्रेस पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.