हैदराबाद – ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा अवतार आढळल्याने भारतातही टेन्शन वाढले आहे. तेलंगणमध्ये तर मागील आठवडाभरात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना शोधण्यासाठी मोहीमच हाती घेण्यात आली आहे.
तेलंगणमध्ये 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून 358 प्रवासी दाखल झाले. आता त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी तेथील यंत्रणांना धावाधाव करावी लागणार आहे. ब्रिटनमधून आलेले प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना उपचारासाठी रूग्णालयांत दाखल केले जाणार आहे.
तर, करोना निगेटीव्ह प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणमध्ये आतापर्यंत करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. तसे असले तरी तेथील आरोग्य आणि इतर यंत्रणांकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.
मुंबईत एका दिवसात 590 प्रवासी दाखल
ब्रिटनमधून मंगळवारी 3 विमानांतून 590 प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यातील एकाही प्रवाशामध्ये करोना संसर्गाची लक्षणे आढळली नाहीत. तरीही 299 प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाइनसाठी विविध हॉटेलांमध्ये धाडण्यात आले.
ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांत 187 मुंबईचे तर 167 उर्वरित महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. इतर 236 प्रवासी इतर राज्यांमधील आहेत. परराज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यांमध्ये पाठवले जाणार आहे.