निर्देशांकांत वाढ : रुपया उसळला 56 पैशांनी
मुंबई – बऱ्याच औषध कंपन्यांनी करोनावरील लस विकसित करून प्रायोगिक तत्त्वावर त्याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर जीएसटी संकलन वाढून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढली आहे. या कारणामुळे शेअरबाजाराबरोबरच चलनबाजारातही उमेद परतली आहे. त्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यातही भरघोस वाढ झाली.
बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 429 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी वाढून 35,843 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 121 अंकांनी वाढून 10,551 अंकांवर बंद झाला.
टायटन, टाटा स्टील, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर वधारले. ऍक्सिस बॅंक, कोटक बॅंक, एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर घसरले. आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी म्हणाले की, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत या देशात लस विकसित करण्याचे प्रयोग चालू आहेत. बऱ्याच प्रयोगांना प्राथमिक पातळीवर यश मिळत आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजारात आशावाद परतला आहे.
जीएसटी संकलनात वाढ व पीएमआय वाढल्याचा परिणाम
त्याचबरोबर भारतातील जीएसटी संकलन वाढले आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक 50 च्या जवळ गेला आहे. त्याचबरोबर जून महिन्यात वाहन विक्री वाढली आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार आशावादी झाले असून खरेदी वाढत आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येत आहेत. यामुळे क्रुडचे दर 0.86 टक्क्यांनी वाढून 42.39 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले.
गुरुवारी रुपयाच्या मूल्यात तब्बल 56 पैशाची सुधारणा झाली. भारताची चालू खात्यावरील तूट संपुष्टात आल्याची आकडेवारी परवा जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर भारत सरकारने निर्यात वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. भारताची परकीय गंगाजळी 500 अब्ज डॉलरच्या पुढे आहे. या कारणामुळे भारतीय चलन वधारत आहे. आज रुपयाचा भाव 56 पैशांनी वाढून रुपया 75.04 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.
रेल्वेसंबंधी शेअर उसळले…
रेल्वेने बऱ्याच मार्गावर खासगी कंपन्यांना परवानगी दिल्यामुळे रेल्वेसंबंधी कंपन्यांच्या शेअरच्या भावात 13 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 109 मार्गावर 151 रेल्वे खासगी मदतीने चालविल्या जाणार आहेत. टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, सिमको, रेल विकास निगम, टिटागड बॅगन्स, आयआरसीटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली. रेल्वेत खासगी गुंतवणूक वाढावी याकरिता सरकार प्रयत्नशील आहे.