मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याचे फळ मिळण्याची अपेक्षा

श्रीकांत कात्रे
जिल्ह्यातील रखडलेले प्रश्‍न मार्गी लागावेत; पर्यटन आणि औद्योगिक विकासाची मोठी संधी

सातारा  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्‍वरला तीन दिवस विश्रांतीसाठी येत असले तरी महाबळेश्‍वरमध्ये आल्यावर सातारा जिल्ह्याच्या रखडलेल्या प्रश्‍नांसदर्भात त्यांनी निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून महाबळेश्‍वरला येण्याची परंपरा यानिमित्ताने जपली जाणार आहेच. त्याचप्रमाणे लोकांच्या अपेक्षा जाणून प्रश्‍नांवर मार्ग काढण्याची भूमिका मुख्यमंत्री म्हणून येणारे ठाकरे घेतील, अशी आशा आहे. विशेषतः जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांचा पाणीप्रश्‍न, औद्योगिक विकासातील अडथळे आणि पर्यटन विकासाच्या अनुषंगाने जिल्ह्यात काही बदल घडले तर मुख्यमंत्र्यांच्या या महाबळेश्‍वर मुक्कामातून जिल्ह्याचे हित साधले जाऊ शकणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दरवर्षी महाबळेश्‍वरला सहपरिवार हजेरी लावायचे. त्यांच्याबरोबर उद्धव आणि राज यांच्यासह कुटुंबातील सदस्यही असायचे. या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत महाबळेश्‍वरला झालेल्या शिबिराच्या आठवणी अनेकांना आठवतात. आता वेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाबळेश्‍वरला येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता असणे साहजिक आहे.

हा दौरा विश्रांतीसाठी असला असे सांगितले जात असले तरीही अनेक कार्यकर्ते, शिष्टमंडळे त्यांना भेटण्याची शक्‍यता आहे. त्यांचे प्रश्‍न श्री. ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांचा उहापोह होण्याची शक्‍यता आहे. त्यात प्रामुख्याने दुष्काळी भागासाठी असलेल्या पाणीयोजनांना गती मिळण्यासाठी काही निर्णय अपेक्षित आहेत. जिहे कठापूर, उरमोडी, टेंभू, नीरा देवघर या प्रकल्पातील पाण्याचा लाभ प्रत्यक्षरित्या दुष्काळी भागाला मिळण्यासाठी तसेच रखडलेल्या कालव्यांची कामे होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. सर्व प्रकारची अनुकूलता असूनही औद्योगिक विकासाकडे होणार दुर्लक्ष जिल्ह्याचे मोठे नुकसान करीत आहे.

शिरवळ, खंडाळा परिसरात औद्योगिक विकास होत आहे. मात्र, जिल्ह्यातील साताऱ्यासह जुन्या औद्योगिक वसाहती असून नसल्यासारख्या आहेत. त्यांच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी काही मोठे प्रकल्प आणण्याबरोबरच आयटी क्षेत्रासाठीही विकासाची संधी इथे आहे. जिल्ह्यात नैसर्गिक पर्यटन व धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी अनुकूल वातावरण आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच पर्यटकांना आनंद देण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणांचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो.

महाबळेश्‍वर, पाचगणी, कोयनानगर, कास, बामणोली अशा निसर्गसंपन्न परिसराची ओढ पर्यटकांना आहे. परंतु, वाहतूक कोंडीपासून इतर अनेक समस्यांनी ही पर्यटनस्थळे दुर्लक्षित होऊ लागली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले प्रतापगड, अजिंक्‍यतारा, सज्जनगड यासारखे अनेक गडकोट पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

म्हसवड, शिखर शिंगणापूर, पुसेगाव, औंध, पाल, मांढरदेव, चाफळ यांसह विविध धार्मिक स्थळांनाही लोकांची नेहमीच गर्दी असते. नैसर्गिक आणि धार्मिक स्थळांचा योग्य मेळ घालून विकासाचा आराखडा तयार केला तर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्याची संधी असतानाच पर्यटकांनाही सुविधा मिळूून सहज आनंद घेता येणे शक्‍य आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही या दौऱ्यात असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी अनुकूल संधीचा फायदा जिल्ह्याला करून देण्याचे नियोजन झाले तर ते उपयुक्त ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.