नांदेड – मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्यक झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड येथे ही दोन स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता ही दोन्ही कार्यालये नांदेड येथे सुरू झाल्याने 4 जिल्हे औरंगाबाद विभागात तर इतर 4 जिल्हे नांदेड विभागात सुरू झाल्याने संकल्पचित्र व गुणवत्ता नियंत्रण कामांना गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
नांदेड येथे स्नेहनगर भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकुलात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षता व गुणनियंत्रण आणि संकल्पचित्र विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शासनाच्या विविध प्रकल्पातील योजनांच्या कामाचा व्याप केवळ औरंगाबाद येथे एकच कार्यालय असल्याने त्यावर पडत होता. आता हा व्याप विभागाला जाऊन विकास कामांच्या आरेखन, संकल्पचित्राचे काम नांदेड येथे सुरू झाल्यामुळे या होणारा विलंब टाळता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.