देशात 173 जिल्ह्यांमध्ये “एनसीसी’च्या विस्तार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मंजूरी

नवी दिल्ली  – देशाच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ आणि सीमा क्षेत्रात मिळून एकूण 173 जिल्ह्यांमधे राष्ट्रीय छात्र सेनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात याबाबतची घोषणा केली होती. या विस्ताराअंतर्गत एक हजारपेक्षा जास्त शाळा महाविद्यालयांमधे राष्ट्रीय छात्र सेना सुरू करण्यात येणार असून सुमारे 1 लाख छात्रसैनिकांची भरती होईल. त्यांच्या प्रशिक्षणासाठी लष्कराची 53, नौदलाची 20 आणि हवाईदलाची 10 अशा एकूण 83 युनिट्‌सची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

सीमाभागात लष्करातर्फे, तटवर्ती भागात नौदलातर्फे तर हवाईदल ठाण्यांजवळच्या परिसरात हवाईदलातर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आघाडीवर लष्करी जीवनाचा आणि शिस्तीचा अनुभव मिळेल. तसेच सेनादलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल. लष्करात भरती होणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या प्रशिक्षणामुळे उपयोगी मार्गदर्शनही मिळेल, असे सरकारी पत्रकात म्हटले आहे. राज्यसरकारांच्या सहयोगाने ही योजना राबवण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.