खर्चामध्ये विखे, कांबळे अव्वल

खा. लोखंडेंचा कांबळेंपेक्षा 5 हजार रुपये खर्च कमी
विखेंचा 64 लाख तर कांबळेंचा 59 लाख खर्च सादर
नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ.सुजय विखेंसह मतदारसंघातील 19 उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडेसह 20 उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला. यामध्ये नगर मतदार संघातून खा. विखे तर शिर्डी लोकसभा मतदार संघात आ. भाऊसाहेब कांबळे खर्चात अव्वल ठरले आहेत. या उमेदावारांना 22 जूनपर्यंत निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा, असा अल्टिमेटम निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांनी दिला होता.

मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे भाग 1 ते 4 अनुक्रमी 1 ते 10 शपतपत्र व इतर खर्चाबाबत उमेदवारांनी खर्च सादर केला. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे यांच्या सर्वाधिक 64 लाख 49 हजार 332 रुपये खर्च झाला. तर शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार आ. कांबळे यांचा 59 लाख 79 हजार 132 रुपये खर्च झाला आहे. शिर्डी मतदार संघाचे विजयी उमेदवार सदाशिव लोखंडे हे कांबळेंपेक्षा 5 हजार रुपयांनी पिछाडीवर असून त्यांनी 59 लाख 73 हजार 183 रुपये खर्च केला आहे. तसेच नगर दक्षिण मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 रुपये खर्च सादर केला आहे.

या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर 30 दिवसाच्या आत खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक होते. हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील 39 उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला आहे. नगर मतदार संघातील उमेदवारांनी 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, 19 उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च डॉ. विखेंनी 51 लाख 89 हजार 289 रुपये खर्च सादर केला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार आ.जगताप यांनी 42 लाख 40 हजार 846 रुपये खर्च दाखवला होता.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली होती. 19 एप्रिलपर्यंत खा. लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 30 लाख 8 हजार 673 रूपये आहे. तर खा. लोखंडे यांनी घोषीत केलेला निवडणूक खर्च 24 लाख 83 हजार 498 रुपये आहे. याशिवाय कॉंग्रेसचे आ. कांबळे यांनी 3 लाख 84 हजार 339 रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च 8 लाख 8 हजार 644 रुपये झाला होता. आज मात्र कांबळे खर्चात अव्वल ठरले असून त्यांनी 59 लाख 79 हजार 132 रुपये खर्च केला असल्याचा अहवाल निवडणूक आयोगास सादर केला आहे.

अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी 28 लाख 12 हजार 544 रुपये, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते यांनी 7 लाख 2 हजार 102 रुपये, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान 14 लाख 46 हजार 186 रुपये खर्च सादर केला आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने स्वंतत्र कक्ष स्थापन केले होते. यामध्ये उमेदवाराला 70 लाखांची खर्च मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेच्या अधिन राहून उमेदवारांनी खर्च सादर केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)