‘वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा’

मुंबई  – करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची आवश्‍यकता आहे. रुग्णशय्या, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्‍यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी मंत्रालयातून दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सध्या ऑक्‍सिजनचे 100 टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्‍सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृत अवस्थेत येणारे कोविड रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विहित केलेल्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करण्याची आवश्‍यकता आहे. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण उशिराने 8 दिवसानंतर रुग्णालयात दाखल झाला तर नंतर तो दगावतो, त्यासाठी अगोदरच चाचणी करण्याची आवश्‍यकता असून त्यासाठी ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा
राज्यात रेमडेसिविरचा मोठ्या संख्येने पुरवठा सुरू होईल, भारताबाहेर निर्यातबंदी असल्याने त्याचा निश्‍चितच फायदा होईल. मात्र रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. तसेच रेमडेसिवीर, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्स आदी अत्यावश्‍यक साधन सामुग्रीच्या माहितीसाठी राज्याचा एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. या डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना संपूर्ण माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.