विद्यमान आमदारांना करावा लागणार संघर्ष

प्रसाद शेटे
जावली
जावळीत महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह, विधानसभेची तयारी सुरू


मेढा – लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांना जवळपास सव्वालाखांचे मताधिक्‍य मिळाले तरी शिवसेनेला झालेल्या साडेचार लाख मतांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या इच्छुकांच्या उमेदवारीच्या रस्सीखेचीवरून राष्ट्रवादीविरुध्द महायुती असा मोठ्या संघर्षाची शक्‍यता आहे.

जावळी तालुका पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. याच विकासकामांच्या जोरावरच शिवेंद्रराजे आगामी निवडणुकीत पुन्हा विजयश्री खेचून आणण्याची खात्री त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सदस्य अर्चना रांजणे यांची या संघर्षात मोलाची साथ ठरणार आहे. अमित कदम अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यांची भुमिका सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

या मतदारसंघातून युतीकडून भाजपचे दीपक पवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पवार यांनाही विधानसभेसाठी मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पवार यांनी जनसंपर्क सुरू केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जावळी मतदारसंघात जोरदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पाय रोवले आहेत. केवळ पाय रोवले नाहीत, हा पक्ष कॉंग्रेसच्या बरोबरीने दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. सलगच्या यशामुळे आणि लोकसभेला झालेल्या मतदानामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता पुढचे लक्ष्य विधानसभा निवडणूक असून, त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×