टाकवे बुद्रुक – आंदर मावळ परिसरातील टाटा डॅममध्ये सावळा ते कशाळ गावादरम्यान मृत माशांचा खच आढळून आला. पाण्यामध्ये एका कासवही मृतावस्थेत आढळले आहे. हा प्रकार विषबाधेमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मावळ ऍडव्हेंचर संस्थेचे विश्वनाथ जावळीकर यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी सकाळी आंदर मावळातील सावळा ते कशाळ दरम्यान टाटा डॅममध्ये मासे मृत्यू असल्याचा प्रकार समोर आला.
मात्र, उन्हाळ्यामुळे मासे मरत असतील असा अंदाज बांधून त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
मात्र, दुपारी मोठ्या प्रमाणात मृत मासे धरणालगत आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मावळ ऍडव्हेंचर संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. सर्व स्वयंसेवकांनी मृत मासे जमा केले. तर काही माशांना शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. हा प्रकार विषबाधेमुळे झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.