एक्‍झिट पोलने उडवलेली धमाल

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अत्यंत झंझावाती आणि रंजक स्वरूपात झाला. त्यामुळे या निवडणुकीविषयी राज्यभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली असतानाच काल या निवडणुकीच्या एक्‍झिट पोलचे निकाल जाहीर झाले. ही निवडणूक पूर्ण एकतर्फीच असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. पाच-पाच वाहिन्यांच्या एक्‍झिट पोलचे निकाल एकाच स्वरूपाचे असतील तर प्रत्यक्ष निकालात फार फरक पडण्याची शक्‍यता अगदी धूसर असते. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भाजप-सेना महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

टीव्ही 9, इंडिया टुडे, न्यूज 18, झी, आणि टाईम्स नाऊ या वाहिन्यांनी विविध पोल एजन्सीजची मदत घेऊन हा एक्‍झिट पोल घेतला. त्या सर्वांचा निष्कर्ष भाजप-सेना युतीला पूर्ण बहुमताने सत्ता मिळणार असाच आहे. प्रत्येक वाहिन्यांचे जागांचे अंदाज काहीसे वेगवेगळे असले तरी सर्वांतून एक समान निष्कर्ष निघाला आहे तो म्हणजे महायुती दोनशेच्या वर जागा मिळवणार आहे. एका वाहिनीने तर महायुतीला तब्बल 243 जागा मिळतील असा अंदाज वर्तवून धमाल उडवून दिली आहे. हा अंदाज चुकीचा ठरेल अशी अजूनही काही जण आशा बाळगून आहेत. त्यांचे म्हणणे असे की, या निवडणुकीत भाजप-सेना युतीविषयी कमालीची नाराजी होती. मोदी सरकारच्या कारभारावरून तसेच मंदीच्या वातावरणावरून ही निवडणूक भाजप-सेना युतीला जड जाणार हे दृष्य स्वरूपात दिसत असतानाही महायुती आधीपेक्षाही अधिक यश घेऊन सत्तेवर येणे कोणत्याच गणितात संभवत नाही.

त्यातच पवारांनी एकहाती किल्ला लढवताना जी वातावरणनिर्मिती केली होती ती पाहता असे निकाल संभवतच नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे. पवारांच्या सातारच्या भर पावसातील सभेने सत्ताधाऱ्यांना धडकी भरवली होती हेही वास्तव आहेच. इतके सगळे वेगवेगळे घटक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असताना आणि त्यातच बंडखोरीचा सर्वात जास्त फटका याच महायुतीला बसलेला असताना असा निकाल लागणे शक्‍यच नाही, असेही काही जण छातीठोकपणे सांगताना दिसले. ज्याला राजकीय वातावरणाचा किमान अंदाज घेता येतो असा माणूसही या एक्‍झिट पोलनिकालावर विश्‍वास ठेवायला राजी नाही. महायुतीला बहुमत मिळण्याची अधिक शक्‍यता आहे; पण त्यांना मिळणाऱ्या जागा एकतर्फी नसतील असे त्यांच्या म्हणण्याचे सार असते.

तथापि लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोदी सरकारच्या विरोधात असेच वातावरण असताना प्रत्यक्षातले निकाल एक्‍झिट पोलनुसारच लागले आहेत हा मुद्दाही येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक्‍झिट पोलने मतदानाची दिशा स्पष्ट होते हे खरे असले तरी हे निकाल तंतोतंत खरे ठरतातच असेही नाही. मात्र अशी स्थिती अगदी अपवादात्मक असते. जशी ती 2015च्या दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडली होती. त्या साली झालेल्या दिल्ली विधानसभेच्यावेळी जे एक्‍झिट पोलचे आकडे होते ते सारेच आकडे आम आदमी पक्षाच्या विजयाने उलटे पालटे झालेले दिसले आहेत.

त्या निवडणुकीत इंडिया टीव्ही, झी टीव्ही या दोन संस्थांनी एक्‍झिट पोलमध्ये भाजपला 27 ते 35 जागा दर्शवल्या होत्या, एबीपी नेल्सने आम आदमी पक्षाला 39 आणि भाजपला 28 जागा दर्शवल्या होत्या. पण प्रत्यक्ष निकाल मात्र आम आदमी पक्षाच्या बाजूने 67 विरुद्ध 3 असा लागला होता. म्हणजेच नेमक्‍या वस्तुस्थितीचा अंदाज वर्तवण्यात एक्‍झिट पोलवाले त्यावेळी कमी पडले होते. त्याच वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही मतदारांनी एक्‍झिट पोलवाल्यांना असाच चकवा दिला होता. त्यावेळी भाजपप्रणीत आघाडी आणि जेडीयूप्रणीत आघाडीमध्ये कॉंटे की टक्‍कर होईल असा अंदाज एक्‍झिट पोल संस्थांनी व्यक्‍त केला होता पण प्रत्यक्ष निकाल मात्र जेडीयूच्याच बाजूने एकतर्फी लागला होता. पण असे अपवादात्मक स्थितीत घडते. आता असा अपवाद यावेळी महाराष्ट्रात होईल का हेच पाहणे बाकी उरले आहे. अन्यथा चित्र बहुतांशी स्पष्ट झाले आहे.

इतके विरोधी वातावरण असताना सरकार इतक्‍या प्रचंड बहुमताने जिंकतेच कसे, या प्रश्‍नावर आता ईव्हीएम सेटींगचेही आरोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी कालच्या मतदानाच्यावेळी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील नवलेवाडीच्या मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकाराचा दाखला दिला जाऊ लागला आहे. काल नवलेवाडीच्या मतदान केंद्रावर कोणतेही बटन दाबले तरी मतदान कमळालाच जात असल्याची तक्रार मतदारांनी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही म्हणे या प्रकाराला दुजोरा दिला आणि तेथील मशिन्स बदलली. असले प्रकार जेव्हा होतात, त्यावेळी मतदार यंत्रात काही तांत्रिक दोष निर्माण होणे शक्‍य मानले तरी प्रत्येक तांत्रिक चुकांमध्ये केवळ कमळालाच मते कशी जातात हे कोडे मात्र काही उलगडत नाही.

देशात हा प्रकार अनेक ठिकाणच्या केंद्रांवर आतापर्यंत झाला आहे. त्याच्या बातम्याही वेळोवेळी आल्या आहेत. कोणतेही बटन दाबवले की मतदान पंजाला किंवा अन्य कोणत्याही चिन्हाला होत असल्याचा एकही प्रकार आतापर्यंत कसा घडला नाही असेही प्रश्‍न यानिमित्ताने विचारले गेले आहेत. इलेक्‍ट्रॉनिक मतदारयंत्रात हेराफेरी करणे शक्‍य नाही, असे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले असले तरी असे प्रकार जेव्हा निदर्शनाला येतात तेव्हा काहींच्या डोक्‍यात किडा वळवळल्याशिवाय राहात नाही. इथे बसून जर चंद्राच्या पृष्ठभागावर सोडण्यात आलेल्या यानाचे नियंत्रण करता येत असेल तर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात अशक्‍य असे काय आहे, असाही जनसामान्यांचा प्रश्‍न आहे. ईव्हीएमच्या वापराबाबतचे असे आक्षेप व्यापक स्तरावरचे आहेत.

अनेक मासलेवाईक उदाहरणेही याबाबतीत घडली आहेत जी पाहता यात काही तरी काळेबरे असावे, असे मानण्यास जागा आहे. प्रत्येक निवडणुकांतील या आक्षेपांच्या पार्श्‍वभूमीवर आता निवडणूक आयोगाने एखाद्या राज्यातील निवडणूक प्रयोगादाखल बॅलेट पेपरवर घेऊन लोकांच्या मनातील शंकांचे कायमचे निरसन करण्यास काय हरकत आहे, या मुद्द्यावर हा विषय येऊन ठेपतो. मुद्दे किंवा आक्षेप काहीही असोत; पण कालच्या महाराष्ट्राच्या एक्‍झिट पोल निकालाच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीचे सत्तेतील पुनरागमन अवघड नाही एवढा तरी निष्कर्ष आज आपण काढू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.