विरोधी पक्षनेतेपदासाठी कसरत,कॉंग्रेसकडे गरजेपेक्षा फारच कमी संख्याबळ

कॉंग्रेसकडे आताही गरजेपेक्षा फारच कमी संख्याबळ

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआने दमदार विजय मिळविल्यामुळे विरोधी पक्षांचा पालापाचोळा झाला आहे. भाजपने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता पुन्हा कायम राखली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला असून सभागृहातही अडचणी निर्माण होणार आहे. कॉंग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या असल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या हातून निसटण्याची चिन्हे आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी बरेच झुंजावे लागले होते. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्यासाठी संपुआमधील 60 खासदारांनी पाठिंबा दिलेले संमतीपत्र सादर करावे लागले होते. आताही त्याचप्रमाणे वेगळी कसरत करून विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील गुलबर्गा मतदारसंघात मल्लिल्लार्जुन खर्गे यांचा पराभव झाल्याने आता कॉंग्रेस कशाप्रकारे राजकीय रणनीती आखते याची उत्सुकता आहे. त्याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

नियमानुसार लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी विरोधी पक्षाकडे किमान 10 टक्‍के जागा असणे आवश्‍यक आहेत. अर्थात 543 खासदारांपैकी किमान 55 खासदार असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळू शकतो. मात्र आताच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडे फक्‍त 52 खासदार असल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळण्याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. कॉंग्रेस पक्षावर ही दुसऱ्यांदा वेळ आली आहे. कॉंग्रेसला आता गंभीरपणे आत्मपरीक्षण करावे लागेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×