पुणे -शहरात करोनामुळे रुग्णाच्या उपचारांसाठी अनेक कुटुंबीयांना पैसे जमवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने सवलतीसह मिळकतकर भरण्यास जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. या मागणीचा ठरावही सुतार यांनी स्थायी समितीत दिला आहे.
महापालिकेकडून दरवर्षी 31 मेपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात 10 ते 15 टक्के सवलत देण्यात येते. तर मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमध्येही प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना या वर्षी मिळकतकरात राज्यशासनाचे कर वगळून सरसकट 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत 31 मेपर्यंत कर भरला, तरच मिळणार आहे. मात्र, शहरातील सध्याची करोनाची स्थिती पाहता दिवसेंदिवस नवे रुग्ण वाढत आहेत.
अनेक जण गंभीर होत आहेत. मागील लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे आता आर्थिक अडचणीत आहेत. अशातच काही घरांत करोना बाधितावरील उपचाराचा खर्च येऊन पडला आहे. त्यात खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये मोजावे लागत असून अनेकांचे पूर्ण कुटूंब बाधित असल्याने त्यांना उपचारांची तजवीज करतानाच अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत त्यांना मिळकतकर भरता न आल्यास सवलतही मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन 31 मेऐवजी सवलतीत कर भरण्यास जुलैअखेर पर्यंत मुदत द्यावी अशी मागणी सुतार यांनी केली आहे.
घरात करोना रुग्ण असल्याने अनेकांना उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करणे अडचणीचे झाले आहे. मागील लॉकडाऊनमुळे अनेकजण कर्जबाजारी आहेत. त्यातही ते कर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना पालिकेने मुदतवाढ देणे गरजेचे आहे. त्याबाबतचे पत्र आयुक्तांना दिले असून तसा ठरावही स्थायी समितीत दिला आहे.
– पृथ्वीराज सुतार, गटनेता, शिवसेना