मुंबई – भारतात गंभीर गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. फाशीची शिक्षा सुनावली तरी, राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या दयेच्या अर्जानंतर अनेकदा फाशी टळते. त्यात महिलांना फाशी होण्याची घटना कधीही घडली नव्हती.
मात्र आता शबनम नावाच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून तिला फाशी देण्यात येणार आहे. तिने प्रियकरासाठी स्वत:च्या कुटुंबीयांची निर्घुन हत्या केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या महिलेचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. स्वतंत्र भारतात महिलेला फाशी होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे.
2008 ची ही घटना आहे. उत्तर प्रदेशमध्ये शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबनम एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांचे अनेक वर्ष प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.
दोघेही मुस्लिम धर्मीय होते, पण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. शबनम ही सैफी जातीची होती तर सलीम हा पठाण जातीचा होता. म्हणून शबनमच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. ही बाब शबनमला रुचली नाही. म्हणून 14 एप्रिल 2008 रोजी रात्री शबनम आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाणार होती. तेव्हा शबनमने जेवणातून आपल्या कुटुंबीयांना झोपीचे औषध दिले.
दरम्यान सलीम आणि शबनम यांच्या भेटीत नात्यात अडसर ठरणाऱ्यांचा काटा काढण्याचे ठरले. त्यानंतर शबनमने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबातील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहिण राबिया यांचा समावेश होता.
खून केल्यानंतर शबनमने अज्ञात व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना संपवल्याचा कांगावा केला होता. मात्र पोलीस चौकशीत शबनमने सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी शबनम आणि सलीमला अटक केली. शबनमने कोठडीत असताना एका बाळाला जन्मही दिला आहे.