निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची अंमलबजावणी लवकर करा

राज्यसभेचे संबंधित यंत्रणांना निर्देश

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना राज्यसभेकडून संबंधित यंत्रणांना करण्यात आली आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्याचे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समर्थन केले.

व्यंकय्या नायडू यांनी याविषयी बोलताना, देशात अशा स्वरुपाच्या घटना घडाव्यात हे अजिबात योग्य नाही. या प्रकरणातील दोषींना आपला बचाव करण्यासाठी सर्व पर्याय देण्यात आले होते. त्यांनी सर्व पर्यायांचा वापर केला आहे. आता न्यायालयाने दिलेली शिक्षा त्यांनी भोगलीच पाहिजे. कोणत्याही प्रकारे एकमेकांकडे बोट दाखवणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षयकुमार ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 1 फेब्रुवारीला तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. त्यासाठी तुरुंगात सर्व तयारी करण्यात आली होती. पण शुक्रवारी 31 जानेवारीला दिल्लीतील न्यायालयाने त्यांच्या फाशीला पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली. या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याची दया याचिका दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. दोषींची न्यायसुधार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.