लंडन/बर्लिन – ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह विविध युरोपियन राष्ट्रांनी करोना विषाणूच्या संसर्गाशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या चीनच्या वस्तू नाकारल्या आहेत. यात स्पेन, तुर्की, नेदरलॅंड याही देशांचा समावेश आहे. आपला प्रभाव वाढविण्यासाठी चीनकडून करोनाचा वापर केला जाऊ शकतो, अशी टीका होत असतानाच उपकरणांमधील दोषही समोर आला आहेत.
संपूर्ण जगात करोना विषाणू पसरवलेल्या चीनमधूनच त्यावरील नियंत्रणासाठी विविध वस्तू निर्यात करण्यात येत आहे. यात टेस्टिंग किट, मास्क आदींसह अन्य वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. चीनने पुरवलेल्या हजारो टेस्टिंग किट, वैद्यकीय साहित्य आणि मास्क मानकांनुसार नाहीत वा सदोष आहेत, असा आरोप स्पेन, तुर्की आणि नेदरलॅंड सरकारने केला आहे.
युरोप सध्या कोरोनाशी लढा देत आहे. इटलीत 12 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो जण बाधित आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चीन सरकारवर टीका केली आहे. डच सरकारने नुकतेच सुमारे सहा लाख मास्क परत मागवले. हे मास्क चीनमधून आयात केले होते. शिवाय विविध औषधी दुकानांत वितरणही करण्यात आले होते. आता मात्र यापैकी एकही मास्क वापरायचे नाहीत, असा निर्णय डच प्रशासनाने घेतला आहे.
स्पेनने चीनच्या कंपनीकडून मागवलेल्या टेस्टिंग किटसोबतही हीच समस्या आढळून या देशाने हजारो किट आयात केले असून, यापैकी 10 हजार किट्स कोरोनाची लागण झाल्याबाबत ठोस निदान करू शकत नाहीत, असे स्पेन सरकारने म्हटले आहे. यावर स्पेनने बोलावलेल्या कंपनीला अधिकृत परवानाच दिला नसल्याचे स्पष्टीकरण चीन दूतावासाने दिले आहे. चिनी टेस्टिंग किट अयोग्य असल्याचा आरोप तुर्कीनेही केला आहे, पण हजार किट योग्य पद्धतीने काम करीत असल्याचेही तुर्कीने सांगितले.
याशिवाय चीनी बनावटीच्या मोबाईल, लॅपटॉप यासह अन्य ग्राहकोपयोगी वस्तूंवरही सामूहिक सामाजिक बहिष्कार घालण्याची मोहिम समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर चालवली जात आहे, हे विशेष.