मुंबई : रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु करण्यात येणार आहे. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
23 मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवारपासून एसटी बस सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
एसटी प्रवासाची नियमावली
* प्रवासाच्या माहिती नियंत्रण कक्ष सुरु करा
* एसटी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करा
* विविध विभागांशी संपर्क साधून प्रवासाचे मार्ग ठरवा
* प्रवाशांनी प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं
* प्रशासनाने प्रवाशाच्या प्रवासाची माहिती घ्यावी
* सोडण्यात येणाऱ्या बससाठी प्रवाशांचे गट करावे
* बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण असाच प्रवास असावा
* प्रवाशांना मधल्या थांब्यांबवर उतरता येणार नाही
* प्रवास सुरु होण्याआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं
* प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणं अनिवार्य
* बसमध्ये प्रवेशाआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत
* प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड सादर करावं
* बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं
* एका सीटवर एकच प्रवासी बसेल याची काळजी घ्यावी
* बसमधील प्रवाशांची ती प्रतींमध्ये यादी करावी
* प्रवासानंतर प्रवाशांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावं
* आगार व्यवस्थापकांनी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी
* परतीच्या प्रवासाआधी बसचं निर्जंतुकीकरण करावं